पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून (२९ नोव्हेंबर) तीन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती विविध लष्करी संस्था, कृषी विद्यापीठाला भेट देणार आहेत. दुपारच्या सुमारास लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, दक्षिण मुख्यालयाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुण्याहून राष्ट्रपती नागपूरकडे रवाना होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी अशा लष्कराच्या संस्थांमधील कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होणार आहेत. त्यानंतर लोणावळ्यातील नौदलाच्या आयएनएस शिवाजी संस्थेला त्या भेट देणार आहेत. तसेच लोणावळ्यातील कैवल्यधाम येथील योगसंस्थेत जाणार आहेत. त्यानंतर थेट एनडीए येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. गुरुवारी (३० नोव्हेंबर) ‘एनडीए’च्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळ्याला त्यांची उपस्थिती असणार असून, या वेळी स्नातकांच्या वतीने त्या मानवंदना स्वीकारणार आहेत. त्यानंतर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन पुण्यातील राजभवन येथे मुक्कामी येणार आहेत. १ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राजभवन येथून वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर दुपारी लोहगाव विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.

हेही वाचा >>>ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट : ससूनमधील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षक, समुपदेशक गजाआड

जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

राष्ट्रपती मुर्मू यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपती ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गांवर रंगीत तालीम करण्यात आली आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहे. संबंधित रस्त्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The president is on a three day visit to pune from tomorrow pune print news psg 17 amy