राहुल खळदकर

फळभाज्यांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. घाऊक बाजारात विक्रीस पाठविण्यात येणाऱ्या फळभाज्या भिजलेल्या आहेत. पावसामुळे फळभाज्यांची आवकही कमी झाली असून दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>भाज्या आणखी महाग ; परतीच्या पावसाने पिके पाण्यात; आवक घटली

परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर भागातील फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. फळभाज्यांच्या नवीन लागवडीस एक ते दीड महिने लागतात. पावसामुळे अनेक भागात शेतात पाणी साठले आहे. पाणी साठल्याने काढणीस आलेल्या फळभाज्यांचे नुकसान झाले असून प्रतवारीवर परिणाम झाला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक नेहमीच्या तुलनेत कमी झाली आहे. बाजारात विक्रीस पाठविण्यात आलेल्या फळभाज्या भिजलेल्या आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. फळभाज्या नाशवंत असल्याने खराब झालेल्या फळभाज्यांना फारशी मागणी नाही. एक ते दोन दिवसात फळभाज्या खराब होत असल्याने भाज्या फेकून द्याव्या लागत आहेत. पालेभाज्या खराब झाल्या असल्याचे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>समस्यांच्या विळख्यातील डोंबिवली गावाला दत्तक घ्या ; जागरुक नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव

दिवाळीनंतर फळभाज्यांच्या मागणीत वाढ
दिवाळीत फळभाज्यांच्या मागणीत घट होते. अनेक जण सणासुदीत बाहेरगावी जातात. पुण्यात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मूळगावी जात असल्याने दिवाळीत खाणावळी बंद असतात. त्यामुळे फळभाज्यांच्या मागणीत घट होते. दिवाळीनंतर फळभाज्यांच्या मागणीत वाढ झाल्यानंतर फळभाज्यांचा तुटवडा जाणवेल, असे भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

भातपिकांचे नुकसान
गेले दोन ते तीन दिवस लोणावळा, खंडाळा, मावळ परिसरात मुसळधार पाऊस होत असून हाताशी आलेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

हेही वाचा >>>पुणे : खडकी टर्मिनलबाबत रेल्वे अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

गवार, भेंडी, टोमॅटो, काकडी या फळभाज्यांचे बारमाही पीक घेतले जाते. बारामाही पिकांची लागवड एकाआड केली जाते. पावसामुळे शेतात पाणी साठले आहे. साठलेले पाणी किमान आठवडाभर शेतात राहील. पावसाने उघडीप दिल्यानंतर फळभाज्यांची आवक करणे शक्य होईल. किमान एक ते दीड महिन्यानंतर पुणे विभागातून फळभाज्यांची आवक सुरू होईल. पुढील महिन्यात परराज्यातून फळभाज्यांची आवक सुरू होईल. परराज्यात परतीच्या पावसाने फळभाज्यांचे नुकसान कमी प्रमाणावर झाले आहे. परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने महाराष्ट्रातील सर्व विभागात फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.– विलास भुजबळ, अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड