पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने गवार, टोमॅटो, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- पुणे: खासगी बसच्या धडकेत मृत्यू; कुटुंबीयांना एक कोटी नऊ लाखांची नुकसान भरपाई

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१३ नाेव्हेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी तसेच ३ टेम्पो घेवडा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून ३ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २ टेम्पो गाजर,मध्यप्रदेशातून ६ टेम्पो तसेच हिमाचल प्रदेशातून १ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा- पुणे-नाशिक रस्त्याची दुरुस्ती दहा दिवसांत न केल्यास… खासदार अमोल कोल्हे यांचा संबंधितांना इशारा

पुणे विभागातून सातारी आले १४०० ते १५०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ११ ते १२ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार २० ते २५ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक अशी आवक झाली.

कोथिंबीर, कांदापात, पालक, मेथीच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर, कांदापात, पालक, मुळा, मेथीच्या या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. अंबाडी, चवळईच्या दरात वाढ झाली असून अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दीड लाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिर आणि कांदापातीच्या जुडीमागे २ रुपये, मेथी आणि मुळ्याच्या जुडीमागे ३ रुपयांनी घट झाली आहे. अंबाडी आणि चवळईच्या दरात जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा- सलग तिसऱ्या दिवशी पुणे ठरले राज्यातील सर्वांत थंड हवामानाचे शहर

डाळिंब, अननस, कलिंगड, पपई, बोरांच्या दरात वाढ

फळबाजारात डाळिंब, अननस, कलिंगड, पपई, बोरांच्या दरात वाढ झाली आहे. लिंबू, चिकू, सफरचंदाच्या दरात घट झाली आहे. संत्री, मोसंबी, सीताफळ आणि पेरूचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. डाळिंबाच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अननसाचे दर तीन डझनामागे १०० रुपयांनी वाढले आहेत. कलिंगड, खरबूज, पपईच्या दरात किलाेमागे ५ रुपयांनी वाढ झाली असून बोरांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळबाजारात लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, डाळिंब १५ ते २० टन, पपई १० ते १२ टेम्पो, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, पेरू एक हजार ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), अननस ४ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री २५ ते ३० टन, सीताफळ ५० ते ६० टन, चिकू एक हजार खोकी अशी आवक झाली.

मासळीला मागणी

मासळीला मागणी वाढली असून दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीतील मासळी २०० ते ३०० किलो, नदीतील मासळी २०० ते ३०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १५ ते २० टन अशी आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. चिकन, मटणाचे दर स्थिर आहेत.

Story img Loader