पुणे : शहरातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मध्यवर्ती भागातील १७ पैकी ११ पेठांमधील सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सर्वेक्षण महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील मध्यवर्ती पेठांतील जुन्या वाड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेने जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आत्तापर्यंत ११ पेठांमध्ये २ हजार २३२ वाड्यांची नोंद करण्यात आली असून ही संख्या सध्या अडीच हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर वाड्यांशी संबंधित विविध प्रश्नांबाबत काम करता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – बुलढाणा अपघात : नराधम बस चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांचा आक्रोश

पुण्याचा झपाट्याने विकास होत असला तरी जुन्या वाड्यांचा प्रश्न आजही कायम आहे. मालक-भाडेकरू वाद, कागदपत्रांच्या अडचणी, बांधकाम नियमावलीतील अडथळे आदी विविध कारणांमुळे वाड्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली आहे. शहराच्या पूर्व भागामध्ये जुन्या वाड्यांची संख्या अधिक असून, त्यांचा पुनर्विकास रखडल्याने १९८७ च्या विकास आराखड्यातील रस्त्यांचे रुंदीकरण कागदावरच राहिल्याची वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यंदा जानेवारीपासून मध्यवर्ती भागातील १७ पेठांतील वाड्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू केले. यापैकी ११ पेठांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण करताना वाड्यांची संख्या, वाड्यांचे स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) वाड्यांची मोजमापे, धोकादायक वाड्यांची संख्या, धोकादायक वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांची संख्या नोंदविण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये अतिधोकादायक ९७ वाडे आढळले आहेत, तर धोकादायक तसेच नजीकच्या काळात धोकादायक ठरू शकतील, असे १३८ वाडे आहेत. या सर्व वाडे मालकांना महापालिका प्रशासनाकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – नागपूर : आदिवासी आश्रम शाळांमधील निम्म्या विद्यार्थ्यांना कशाचे आहे व्यसन?

ज्या वाड्यांची डागडुजी करता येऊ शकेल, याची माहिती संबंधित वाड्यातील नागरिकांना मिळावी यासाठीदेखील या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये स्थापत्य लेखापरीक्षण करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश आहे. प्रत्येक वाड्याचे जिओ मॅपिंग करण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The process of survey which is important for speeding up the redevelopment of old mansions in pune city has reached its final stage pune print news apk 13 ssb
Show comments