पुणे: आभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी) गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशभरातील विविध शहरात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी आता एकत्रितपणे दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात होणार आहे.
मुख्य न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या खंडपीठातील न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले. या गुन्ह्यातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित झाली आहेत. सीबीआयला पुन्हा या गुन्ह्याचा नव्याने तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या व्याप्ती मोठी असल्याने आरोपींविरुद्ध देशभरातील विविध शहरांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आरोपींना देशभरातील विविध न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रत्येक न्यायालयात स्वतंत्रपणे न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याऐवजी खटला एकत्रितपणे एकाच न्यायालयात चालविण्याची मागणी आरोपींनी केली होती. त्याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यातील काही आरोपींच्यावतीने पुण्यातील वकील ॲड. प्रतिक राजोपाध्ये यांनी बाजू मांडली होती. संबंधित अर्जावर न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा… जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त नगर रस्त्यावर मोठे वाहतूक बदल… जाणून घ्या पर्याय मार्ग
सक्तवसुली अंमलबजावणी संचलनायाकडून (ईडी) या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज आणि अजय भारद्वाज (दोघेही रा. दिल्ली) यांच्याविरोधात पुण्यातील दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यासह निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) आणि संगणक तज्ज्ञ पंकज घोडे (रा. ताडीवाला रस्ता) यांना या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी अटक केली होती. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आभासी चलन त्यांच्या खात्यावर जमा करुन घेतल्याचे दिसून आले होते. पाटील यांच्याकडून सुमारे सहा कोटी रुपयांचे आभासी चलन जप्त करण्यात आले आहे. पाटील आणि घोडे यांनी आरोपींच्या खात्यातील (वॉलेट) आभासी चलन स्वत:च्या खात्यात वळविल्याचे तपासात निष्पन्न झाले.