पिंपरी : उन्हाळा सुरू झाला असून पाण्याची मागणी वाढली आहे. जूनमध्ये पाऊस पडण्याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. वाहने, रस्ते, घर, गृहनिर्माण संस्था परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापर केल्यास सुरुवातीला नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतरही पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराला मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ७५ तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)कडून २० असे ६०५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी दिवसाला दिले जाते. शहराला गेल्या सव्वाचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्यास पाण्याची टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासून पाण्याचा काटकसरीने, जपून वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळावा. पाणी हे शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये, त्याचा वापर करावा. पिण्याचे पाणी वाहने धुणे, बागकाम, कुंड्यासाठी, घर, इमारत, परिसर स्वच्छ करणे, धुण्यासाठी वापरू नये. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांनामध्ये स्वच्छतागृह, उद्यान परिसर स्वच्छतेसाठी वापरावे.

हेही वाचा >>>संचमान्यतेचा नवा निर्णय वादात; सविस्तर वाचा निर्णय काय…

अंगण, जिने, फरशी धुणे टाळावे. स्वच्छतेकरिता कमीत कमी पाण्याचा वापर करावा. घरातील गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करून घ्यावेत. घरासमोरील रस्त्यावर पाणी मारू नये, रस्ते धुवू नये, काटकसरीने पाणी वापरावे. पाण्याची बचत करावी. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना केले आहे.

गतवर्षीपेक्षा पवना धरणात कमी पाणीसाठा

शहराला मुख्यतः मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. पवना धरणात आजमितीला ४९.६७ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गतवर्षी ५०.२३ टक्के साठा होता. गतवर्षीपेक्षा अर्धा टक्के कमी साठा असून पाण्याची मागणी वाढली आहे.

पाण्याचा अपव्यय केल्यास सुरुवातीला नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस दिल्यानंतरही पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pune municipal corporation warns that if water is misused the tap will be cut off pune print news ggy 03 amy