पुणे: शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी तसेच रेडिमिक्स प्लान्टभोवती पत्रे उभारणे आणि हिरवे आच्छादन टाकणे बंधनकारक असतानाही मेट्रो प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमधील प्रदूषणाची पातळी वाढली असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या ढासळत्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करताना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका प्रशासनाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मेट्रोचे काम करताना होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महामेट्रोकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा… पिंपरीतील वर्दळीचे रस्ते, चौकांचे होणार सुरक्षा परीक्षण

स्वारगेट येथील जेधे चौकात मेट्रो हब आणि बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या चौकात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषण होत असते. मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांटही असून खडी, सिमेंट वाहून आणणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. पण या ठिकाणी काम करताना मेट्रोकडून नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार प्रदूषण रोखण्यासाठी पत्रे लावणे आणि हिरव्या रंगाचे अच्छादन टाकणे बंधनकारक आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्याची तक्रार महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे येत्या दोन दिवसांच्या आता प्रदूषण रोखण्यासाठीच्या ठोस उपाययोजना करा अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pune municipality has warned mahametro to take immediate measures to prevent pollution pune print news apk 13 dvr
Show comments