पुणे: रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ऑगस्ट महिन्यात १९ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागात तिकीट तपासणी पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवासी गाड्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. ऑगस्ट महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान १९ हजार १०१ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ४३ लाख ५६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, अनियमित प्रवास करणाऱ्या ९ हजार १४९ जणांना ५१ लाख ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याचबरोबर सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २३४ जणांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा… ऐन पावसाळय़ात उकाडय़ाने हैराण; अकोल्यात सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअसची नोंद
रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन रेल्वेने केले आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची मोहीम सुरू आहे