पावलस मुगुटमल
पुणे : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मोसमी पावसाचा हंगाम पूर्ण होत असताना राज्यात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यंदाही वितरणातील असमानता काही प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोसळला असताना, मुंबई शहरासह कोकण विभागात अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा ९० टक्क्यांहून अधिक आणि समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
यंदा १० जूनला र्नैऋत्य मोसमी पावसाने तळकोकणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आणि १६ जूनला तो राज्यव्यापी झाला. मात्र, बहुतांश भागात जून महिना कोरडा गेला. त्यामुळे पाण्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच जुलैच्या पहिल्या आठवडय़ानंतर राज्यात सर्वदूर मोठय़ा पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या अखेरीस राज्यात पावसाने सरासरी पूर्ण करून ती ओलांडली. हंगाम संपेपर्यंतच राज्यात पाऊस सरासरीच्या पुढेच राहिला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या कालावधीत काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले.
गतवर्षी मुंबईसह कोकण विभागात अधिक पाऊस झाला होता. मुंबई, पालघरने आघाडी घेत सरासरीच्या तुलनेत २० टक्के अधिक पावसाची नोंद केली होती. यंदा मात्र मुंबई शहरात पावसाची सरासरी पूर्ण झालेली नाही. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांनी पावसाची सरासरी काठावर पूर्ण केली आहे. विभागवार पावसामध्ये कोकण विभागात सर्वात कमी सरासरीच्या तुलनेत ९ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडय़ातही सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहर मागे
मुंबई उपनगरांमध्ये यंदा पावसाने सरासरी ओलांडून २६०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असली, तरी मुंबई शहरातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी उणा आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात १८ टक्के उणे झाला आहे. त्यापाठोपाठ मराठवाडय़ातील हिंगोली जिल्ह्यात उणे ११ टक्के आणि विदर्भातील अकोल्यात सरासरीच्या तुलनेत ११ टक्के पाऊस कमी झाला आहे.