पुणे : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुरुवातीला दोन विमान कंपन्यांची उड्डाणे नवीन टर्मिनलमध्ये सुरू करण्याची योजना आखली आहे. ही उड्डाणे सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही विमान कंपन्यांची उड्डाणे नवीन टर्मिनलमधून सुरू होतील. त्यामुळे एकाचवेळी जुने आणि नवे टर्मिनल सुरू राहणार आहे.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन १० मार्चला झाले. त्यानंतर महिनाभर नवीन टर्मिनलवर चाचण्या घेण्यात आल्या. यानंतर टर्मिनलवरील सेवा सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाकडे (बीसीएएस) प्रस्ताव पाठविण्यात आला. बीसीएएसच्या पथकाने नवीन टर्मिनलची पाहणीही केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी लवकरच मिळण्याची चिन्हे असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन टर्मिनल सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकातून बालकाचे अपहरण करणारा गजाआड; बालकाची सुखरुप सुटका
नवीन टर्मिनलवर पहिल्या टप्प्यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांचे उड्डाण सुरू होईल. प्रत्येक दिवशी विमानांच्या ३२ फेऱ्या करण्याचे नियोजन आहे. इतर विमान कंपन्यांचे उड्डाण जुन्या टर्मिनलवरून सुरू राहील. नवीन टर्मिनलवरून कोणतीही तांत्रिक अडचण न येता उड्डाणे सुरू करण्यात यश आल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर कंपन्यांच्या विमानांची उड्डाणेही नवीन टर्मिनलवरून सुरू होतील. त्यामुळे जुने आणि नवे टर्मिनल एकाचवेळी सुरू राहील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : राज्यात ‘या’ भागाला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’
अतिरिक्त सुरक्षेचीही प्रतीक्षा
नवीन टर्मिनल सुरू करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) दोनशेहून अधिक अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. याला मंजुरी मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात हे जवान अद्याप तैनात करण्यात आलेले नाहीत. टर्मिनल सुरू करण्यासाठी सुरक्षेसाठी हे जवान तैनात होणे आवश्यक आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.
हेही वाचा : सततच्या खोकल्याचं कारण निघालं हळकुंड! वृद्धानं झोपताना तोंडात ठेवल्यानं गेलं फुफ्फुसात अन्…
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनवरील खानपान सेवेच्या दालनांना नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची मंजुरी प्रलंबित आहे. खानपान सेवा नसल्याने नवीन टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू करता येणार नाही. ही मंजुरी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नवीन टर्मिनल सुरू होईल.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ