लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: आगामी वर्षात होणा-या सर्व प्रकारच्या निवडणुकांच्या दृष्टीने पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीची बैठक होत असून या बैठकीत राजकीय विचारमंथन होऊन काही ठराव संमत केले जातील, अशी माहिती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीची रूपरेषा केशव उपाध्ये यांनी पत्रकारांना सांगितली.
आगामी काळात होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्तितीने बैठकीला प्रारंभ होईल, तर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आ़णि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप होईल. खासदार, आमदार आणि मंत्रीगटाच्या स्वतंत्र तीन बैठका होणार आहेत.
हेही वाचा… पुणे: नवले पूल परिसरात अवजड वाहनांच्या वेगाला वेसण
बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, केंद्रातील मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीतील कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनसंपर्क अभियानाची घोषणा, संघटनात्मक आणि राजकीय प्रस्ताव आणि ठरावांना मंजुरी या बैठकीत दिली जाणार आहे. भाजप आणि शिंदे गट सत्तेत आहे. युती म्हणूनच निवडणूक लढविली जाईल. मात्र, संघटनात्मक विस्तारासाठी बैठक महत्त्वपूर्ण आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले.