पुणे: जगभरात हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आग्नेय आशिया विभागात असंसर्गजन्य आजार आणि हृदयविकारामुळे सुमारे ३९ लाख मृत्यू होतात. एकूण मृत्यूंमध्ये हे प्रमाण ३० टक्के आहे. याचवेळी हृदयविकाराचा धोका तिशीतच वाढू लागला आहे. यामुळे कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक ताण मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकार वाढण्याचे कारण बदलत्या जीवनशैलीशी निगडित आहे. तंबाखू सेवन, मद्यपान, सकस आहाराचा अभाव, आहारात मिठाचा अतिरिक्त वापर, शारीरिक हालचाल कमी असणे या कारणांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. हृदयविकाराचा धोका आता तिशीपासून वाढला आहे. त्याचे प्रमाण आता ३० ते ७० वयोगटात सर्वाधिक आहे.
हेही वाचा… राजकारणातही ‘काका मला वाचवा’ असा आवाज…
हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सुमारे ४८ टक्के आहे. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढती शर्करा या दोन गोष्टी प्रामुख्याने हृदयविकाराच्या निदर्शक आहेत. वेळीच त्यांच्याकडे लक्ष दिल्यास त्या नियंत्रणात आणता येतात. त्यातून पुढील धोका कमी करता येतो. आग्नेय आशिया विभागात दर चारपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. याचवेळी दहापैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे.
हेही वाचा… भाजपावर टीका करत शरद पवार म्हणाले, “राज्यकर्त्यांकडून आदिवासींना ‘वनवासी’ संबोधून दिशाभूल…”
याबाबत मणिपाल रुग्णालयातील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. तन्मई यरमल (जैन) म्हणाले की, हृदयाचे आरोग्य उत्तम नसेल तर हृदयविकार होऊ शकतात. यामध्ये रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका येणे आणि हृदयक्रिया बंद पडणे यांचा सामवेश असून हे जीवघेणे आजार आहेत. तुमचे हृदय योग्य काम करत नसेल तर तुम्हाला छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हृदयविकार टाळण्यासाठी…
- आरोग्यपूर्ण आहार घ्या
- नेहमी सक्रिय रहा
- धूम्रपान करू नका
- वजनाकडे लक्ष द्या
- तणावाचे व्यवस्थापन करा
- नियमित तपासणी करा