पुणे : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या ४९ वर पोहोचली आहे. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण असून, पुण्यातही एका रुग्णाची नोंद झाली आहे.

राज्यात १ मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत उष्माघाताचे ४९ रुग्ण आढळून आले असून, त्यात नागपूरमध्ये सर्वाधिक ८ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल बुलढाणा ७, जालना आणि परभणी प्रत्येकी ५, गडचिरोली ४, कोल्हापूर, लातूर, नाशिक, पालघर, रायगड आणि वर्धा प्रत्येकी २, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, पुणे, सांगली, ठाणे, वाशीम आणि यवतमाळ प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात अद्याप उष्माघातामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

उष्माघाताच्या वाढत्या धोक्याबद्दल हिंजवडीतील रूबी हॉल क्लिनिकमधील फिजिशियन डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले की, पुण्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यामुळे उष्णतेशी निगडित आजार वाढू लागले आहेत. या आजारांची लक्षणे सुरुवातीला खूप तहान लागणे, थकवा अशी दिसून येतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. उष्माघातामुळे मूत्रपिंड, यकृतांवर गंभीर परिणाम होण्यासोबत अनेक अवयव निकामी होऊ शकतात. उन्हाळ्यात रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमुळे पोट बिघडण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे नागरिकांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणि शीतपेयांबाबत काळजी घ्यावी.

उष्माघाताचा तडाखा

वर्षएकूण रुग्णमृत्यू
२०२३३,१९११४
२०२४३४७
२०२५ (१ मार्च ते २२ एप्रिल) – ४९

काळजी काय घ्यावी?

  • बाहेर जाताना सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली न्यावी.
  • दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळून शक्यतो सावलीत थांबावे.
  • सैलसर कपडे परिधान करावेत आणि गडद रंगाचे कपडे टाळावेत.
  • अशक्तपणा अथवा जास्त उष्णता जाणविल्यास विश्रांती घ्या.
  • शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आईस पॅक वापरा.