पिंपरी: शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही राज्य शासन त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले. केवळ पर्यावरण विभागाच्या ना हरकत दाखल्यामुळे नदीसुधार योजना रखडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी तिन्ही नद्यांचा आराखडा तयार केला. पवना नदीचे २४.४० किलोमीटर अंतराचे दोन्ही बाजूंच्या काठाचे काम केले जाणार असून, एक हजार ५५६ कोटी रुपयांचा खर्च आहे. इंद्रायणीच्या एका बाजूचा १८.८० किलोमीटर अंतराचा काठ असून, त्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांचा खर्च आहे. तर मुळा नदीच्या १४.४० किलोमीटर अंतराच्या एका बाजूचे काम करण्यासाठी ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील वाकड ते सांगवी पूल या ८.८ किमी अंतराच्या पहिला टप्प्यातील २७६ कोटी ५४ लाख खर्चाचे काम बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनला देण्यास स्थायी समितीने २५ एप्रिल रोजी मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यातील कामासाठी २०० कोटींचे कर्जरोखे उभारले आहे.

हेही वाचा… हॉकीपट्टूसाठी खुशखबर! नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानाचे काम प्रगतीपथावर

इंद्रायणी नदी प्रकल्पाचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला असून, त्यास ५५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. ५० टक्के केंद्र सरकार आणि उर्वरित प्रत्येकी २५ टक्के राज्य सरकार आणि महापालिका करणार आहे. इंद्रायणीच्या एका बाजूचा १८.८० किलोमीटरचा काठ शहरात येतो. त्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि आळंदी नगर परिषद करणार आहे.

नदीच्या पाण्यास दुर्गंधी

रसायनमिश्रित, सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. पावसाळा सोडल्यास आठ महिने नदीतील पाण्याची प्रचंड दुर्गंधी येते. पाण्याचा रंग काळपट, हिरवा दिसतो. उन्हाळ्यात जलपर्णीने पात्र व्यापलेले असते.

राष्ट्रीय हरित लवादाने सुधारित पर्यावरण ना हरकत दाखला घेण्यास सांगितले. त्यानुसार पुणे महापालिकेने शासनाकडे अर्ज केला. मान्यता मिळताच मुळा नदीचे काम सुरू केले जाईल. पवना नदीच्या कामासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या समितीची परवानगी राहिली आहे. त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. – संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The river improvement scheme has been stalled due to the no objection certificate from the environment department pune print news ggy 03 dvr