पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन – एमएसआरडीसी) अतिरिक्त पोलीस कर्मचारी, सहा सुमो वाहने, गस्ती पथक, डेल्टा फोर्स तैनात करण्यात येणार आहे. महामार्गावरील गर्दीची आणि अपघाताची ठिकाणे निश्चित करून नियम मोडणाऱ्या, मार्गिका सोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अखेर रस्ते महामंडळाला जाग आली असून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कडक पावले टाकणयास सुरूवात करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होऊन माजी आमदार विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले. या महामार्गावर असणारी वळणे, घाट रस्ते, बोगदे यांमुळे वाहनांचा वेग आणि निष्काळजीपणा अशा अनेक कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्ते विकास महामंडळाची अनेक कामे प्रलंबित असल्याने या महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.

महामंडळाकडून महामार्गावरील धोकादायक झालेला अमृतांजन पूल देखील पाडण्यात आला आहे. तरीदेखील वाहतूक कोंडीसह विविध समस्या अद्यापही कायम आहेत. या पार्श्वभूमीवर रस्ते महामंडळाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई –

“पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर होणारे अपघात, अनुचित प्रकार आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी वाढविण्यात आले आहेत. आपात्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी एमएसआरडीसीचे विविध टप्प्यात सहा सुमो कार, पेट्रोलिंग पथक, डेल्टा फोर्स, १२ दुचाकी वाहने आणि इतर कर्मचारी मदतीसाठी कार्यरत आहेत. गर्दीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस आणि एमएसआरडीसीचा एक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे, तर नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.”, असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी सांगितले.

विविध उपाययोजना –

रस्ते महामंडळाकडून अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. बेशिस्त वाहचालकांवर दंडात्मक कारवाई केली, तरी अपघातांचे सत्र थांबलेले नाही. तसेच महामार्गाच्या घाट रस्त्यांचा भाग दरडप्रवण असल्याने मागील दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संरक्षक जाळ्या, कॉक्रीट वॉल, डोयगोनल टो-रोप, शॉर्टक्रिट, गॅबियन वॉल बसविण्याचे कामे करण्यात आली आहेत. महामार्गा दरम्यान असणाऱ्या धोकादायक ठिकाणांची, अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या वळणांची पूर्वकल्पना यावी म्हणून सावधानतेचे फलक महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत., असेही रस्ते महामंडळाकडून सांगण्यात आले.