पुणे : ससून रुग्णालयातून कैद्याने पलायन केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. बंडगार्डन पोलिसांनी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ बाहेरील तसेच इतर ठिकाणच्या सीसीटीव्हीचे डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) चौकशीसाठी गुरुवारी ताब्यात घेतले. याचबरोबर विभागीय आयुक्त सौरभ राव हे उद्या (ता.६) ससून रुग्णालयाला भेट देऊन झाडाझडती घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ससून रुग्णालयातून सुरू असलेल्या या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैदी ललित पाटील हा आरामशीर ससूनमधून बाहेर चालत जाताना दिसला होता. तसेच, तो पुढील चौकातच असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये तासभर थांबल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तांत्रिक तपासात अडथळे येत आहेत. त्याला मदत करणारा त्याचा भाऊ आणि एक महिला वकीलही पळून गेली आहे. या दोघांचाही माग पोलीस काढत आहे.
हेही वाचा – कौटुंबिक वादातून खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या
ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच दोन कोटींच्या मॅफेड्रॉन या अमली पदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यातील मुख्य आरोपी पाटील हा रुग्णालयातून हे रॅकेट चालवत होता. ललितचा भाऊ आणि रुग्णालयाच्या उपाहारगृहातील एकजण त्याला मदत करीत होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाटील हा रुग्णालयातून पसार झाला. यामुळे ससून प्रशासन, कारागृह प्रशासन आणि बंदोबस्तावर असलेले पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांसह नऊजणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
आरोपी पाटील हा रुग्णालयात क्षय आणि हर्नियावर उपचार घेत असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मागील चार महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. या कालावधीत त्याची शस्त्रक्रिया झाली नाही. परंतु, पोलिसांनी अमली पदार्थ पकडल्याची कारवाई करताच तातडीने दुसऱ्या दिवशी त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व प्रकरणात रुग्णालयातील अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हेही वाचा – जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे सांगून राजस्थानमधील चोरट्याने ‘अशी’ केली फसवणूक
ससून प्रशासनाचे मौन
रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविणारा आरोपी पळून गेल्याने रुग्णालय प्रशासनाकडे बोट दाखविले जात आहे. यातच आरोपींसाठी असलेल्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये अनेक महिने आरोपी मुक्काम ठोकत आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर दिले जात नाही. याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.