पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील ‘पुण्यदशम्’ गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या गाड्या संचलनात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या केवळ नऊ गाड्यांद्वारे पेठांसह मध्यवर्ती भागातील प्रवाशांना सेवा दिली जात असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी साध्या गाड्या पीएमपी प्रशासनाकडून संचलनात आणण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, येत्या काही दिवसांत पुण्यदशम् गाड्या टप्प्याटप्प्याने संचलनात येतील, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. शहरातील पेठांसह मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते लक्षात घेऊन पीएमपीकडून पुण्यदशम् सेवा सुरू करण्यात आली आहे. दहा रुपयांत ही सेवा दिली जात आहे. त्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात ५० गाड्या आहेत. या गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र ८ जुलै रोजी संपले आहे. त्यामुळे या गाड्या प्रवासी सेवेत नव्हत्या. त्यापैकी शनिवारी (१५ जुलै) नऊ गाड्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या केवळ नऊ गाड्या संचलनात आहेत. येत्या बुधवारी (१९ जुलै) ११ गाड्यांना फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित गाड्यांना २२ जुलैपर्यंत प्रमाणपत्र प्राप्त होईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा – खाद्यतेल उद्योगासमोर सरकीच्या टंचाईचे सावट, जाणून घ्या काय होतील परिणाम?

हेही वाचा – राज्यात आतापर्यंत सर्वांत कमी पाऊस सांगलीत; ‘हे’ जिल्हेही कोरडे

फिटनेस प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित कंपनी त्यांच्या पोर्टलवरून गाड्यांची ऑनलाइन केवायसी आणि व्हीएलडीटी प्रमाणपत्र देणार आहे. कंपनीकडून ही प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर पीएमपीकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला ती सादर केली जाणार आहेत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे कंपनीकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यास पीएमपीला विलंब होत आहे. त्यामुळे या गाड्या संचलनात येण्यास अडचणी निर्माण झाल्या असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, साध्या गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The service of punyadasham in pmp fleet has been interrupted pune print news apk 13 ssb