कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. आधी ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला.. टिळक यांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापट यांचा का?.. समाज कुठवर सहन करणार? अशा आशयाचे सूचक भाष्य करणारे फलक कसबा विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले होते. आता ‘आमची ही ठरले, धडा कसा शिकवायचा.. कसबा हा गाडगीळांचा.. कसबा हा बापटांचा.. का काढला आमच्याकडून कसबा.. आम्ही दाबणार नोटा…’ अशा आशयाचा फलक नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.
या फलकांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या फलकाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे. कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी, अशी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर भूमिका घेतली होती. त्यांना किंवा मुलगा कुणाल याला भाजपकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा असतानाच भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सातत्याने कसब्यातील विविध भागात असे फलक लावण्यात येत आहेत.
हेही वाचा- चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोर राहुल कलाटेंविरोधात फ्लेक्सबाजी? कलाटे म्हणाले, “खरा शिवसैनिक..”
दरम्यान, हिंदू महासंघानेही ब्राह्मण उमेदवार न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली. कसब्यातून टिळकांना उमेदवारी नाकारण्यात आली. सध्या ब्राह्मण समाजाचा एकही आमदार नाही. ब्राह्मण समाजावर आरोप होतात, तेव्हा त्याचे उत्तर देणारा प्रतिनिधी आवश्यक आहे, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगत हिंदू महासंघाकडून दवे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा- वर्षातले ३६५ दिवस काही जण धंदा म्हणून पाहतात; उद्योगमंत्री उदय सामंत यांची संजय राऊत यांच्यावर टीका
टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या शैलेश आणि कुणाल टिळक यांची नाराजी दूर झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून टिळक यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन टिळक कुटुंबीयांची ‘समजूत’ काढल्यानंतर प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय शैलेश यांनी घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोपरा सभांचे नेतृत्व करणार असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले, तर कमी वेळात काम करून रासने यांना विजयी करण्याचा निर्धार शैलेश यांनी व्यक्त केला.