पुणे : काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी मौन बाळगत यासंदर्भातील प्रश्नाला बगल दिली. थोरात यांचे पत्र तुमच्याकडे आहे का, असेल तर दाखवा असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काढता पाय घेतला, तर थोरात नाराज आहेत की नाहीत हे त्यांना विचारा,असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठे राजकारण झाले. सत्यजित या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत जे राजकारण झाले, ते व्यस्थित करणारे आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. यासंदर्भात नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले.
काँग्रेसच्या विचारावरच वाटचाल – थोरात
संगमनेर : काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे, अशी ग्वाही देतानाच नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या राजकारणाने व्यथित झालो असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.