दुष्काळाच्या झळा, उन्हाचा चटका आणि घामाच्या धारा या सगळ्यामुळे त्रासलेल्या सामान्यांना दिलासा देणारा मान्सून मंगळवारी त्याच्या ठरलेल्या वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला.
दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत सुरू असलेला पाऊस मान्सूनचा असल्याचे पुणे वेधशाळेने मंगळवारी सांगितले. दरवर्षी साधारणपणे सात जूनला मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. यावेळी वेळेआधी तीन दिवस तो महाराष्ट्रात डेरेदाखल झाला. एक जूनला मान्सूनचा केरळमार्गे भारतात प्रवेश झाला होता.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. कोकणातही गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी पुण्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यंदा संपूर्ण मे महिन्यात वळिवाच्या सरींनी पुण्याला हुलकावणी दिली. जून महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून पुण्याच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळताहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा