पुणे : पुणे ते लोणावळा विभागात खडकी ते पुणे स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा बसविण्याचे काम रेल्वेने मेगाब्लॉक घेऊन यशस्वीरीत्या पूर्ण केले. यामुळे पुणे-लोणावळा विभागात ६४ किलोमीटरचे स्वयंचलित सिग्नलिंगचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात या गाड्यांना होणारा विलंब कमी होणार असून, त्यांचा वेगही वाढणार आहे.

खडकी-पुणे स्थानक या दरम्यान दोन नवीन स्वयंचलित सिग्नल कार्यान्वित केले असून, सध्याच्या सात सिग्नलमध्ये बदल करण्यात आले आहेत. याचबरोबर नऊ नवीन ट्रॅक सर्किट कार्यान्वित करण्यात आले आहेत. पुणे स्थानकातील रूट रिले इंटरलॉकिंगमधील बदलासह या कामात सिग्नलच्या दृष्टीनेदेखील बदल करण्यात आला. याचबरोबर स्वयंचलित इशारा प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. लोणावळ्यापासून खडकीपर्यंत हे काम आधी पूर्ण झाले होते. आता पुणे स्थानकापर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

हेही वाचा – पिंपरी : फ्लिपकार्टच्या हबमधून मोबाईल लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक, अशी करायचा चोरी…

खडकी येथे ११२ मार्गांचे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग करण्यात आले आहे. त्यात मुख्य मार्गाच्या चार कार्यरत मार्गांव्यतिरिक्त मिलिटरी यार्डच्या चार मार्गांच्या इंटरलॉकिंगचा समावेश आहे. खडकीच्या सर्व ट्रॅक सर्किटच्या दुहेरी शोधाची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंचलित सिग्नलिंगसाठी शिवाजीनगर येथील पॅनेल इंटरलॉकिंगमध्ये बदल करण्यात आले. हे स्वयंचलित सिग्नलिंग सुरू केल्याने पुणे-लोणावळा विभागात रेल्वे गाड्या धावण्याची क्षमता वाढणार असून, रेल्वेच्या कामकाजातील मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे.

हेही वाचा – मंत्रिपदावरून हकालपट्टीच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल मनात…”

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी सांगितले की, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेमुळे रेल्वे मार्गांची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे कमी अंतरात जास्त गाड्या मार्गावर धावू शकतात. यामुळे गाड्यांना होणारा विलंब कमी होणार असून, त्यांचा पुणे-लोणावळा या विभागात वेगही वाढणार आहे.

Story img Loader