पुणे : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेत (एमएचटी-सीईटी) पीसीबी आणि पीसीएम गटातील मिळून ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. गेल्या वर्षी २८ जणांना १०० पर्सेंटाइल होते. राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) रविवारी निकाल जाहीर झाला.
सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, खुल्या प्रवर्गातील १८ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइलसह प्रथम क्रमांक मिळवला. ओबीसी प्रवर्गात शंभर पर्सेंटाइलसह आठ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनुसूचित जाती प्रवर्गात मुंबईच्या परेश क्षेत्री, नागपूर येथील सना वानखेडे, अनुसूचित जमाती प्रवर्गात अकोला येथील सृजन अत्राम, रांची येथील सुयांश चौहान, विमुक्त जाती प्रवर्गात नाशिक येथील रिहान इनामदार, रांची येथील मंथन जाधव, भटक्या जमाती (ब) प्रवर्गात कोल्हापूर येथील सलोनी कराळे, पुणे येथील देवेश मोरे, भटक्या जमाती (क) प्रवर्गात ओम गोचाडे, वर्धा येथील प्रणव गावंड, भटक्या जमाती (ड) प्रवर्गात वर्धा येथील आराध्या सानप, जयपूर येथील समृद्धी ओंबासे अग्रस्थानी आहेत.
हेही वाचा >>>अकरावी प्रवेशप्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद; यंदा किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
ताण आल्याने संकेतस्थळ मंदावले
सीईटी सेलने सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र, निकाल जाहीर होताच काही वेळात संकेतस्थळावर ताण आला. त्यामुळे बराच वेळ निकाल पाहता येत नव्हता. परिणामी, अनेक पालक, विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी ताटकळावे लागले.