पुणे : राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्‍के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही सवलत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यापासून अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. यासंदर्भात खासगी विद्यापीठांना शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा अन्य आर्थिक सहाय्य मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शासनाकडून शैक्षणिक शुल्क सवलती देण्यात येत नाहीत. या विद्यापीठांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आणि आकारण्यात येणारे शुल्क विचारात घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठात प्रवेश घेताना आकारण्यात येणारे शुल्क भरणे अडचणीचे होते. या पार्श्‍वभूमीवर खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण दहा टक्‍के इतक्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्‍के सवलत खासगी विद्यापीठांना देणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शुल्कात विद्यापीठ कोणत्याही नावाने आकारत असलेल्या सर्व शुल्कांचा समावेश असेल. खासगी विद्यापीठांनी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याबाबतची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशावेळीच करणे आवश्‍यक राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state government has decided to give concession in education fees to economically weaker students in universities ccp 14 amy