पुणे : राज्यातून युरोपीय देशांसह चीन, रशिया, श्रीलंका आणि अरब देशांत द्राक्षनिर्यात सुरू झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून नेदरलॅण्ड आणि हॉलंडला प्रामुख्याने निर्यात वाढली आहे. मागील १५ दिवसांत नाशिक, सांगलीतून युरोपला ३६४ कंटेनरमधून ४८७० टन द्राक्षे निर्यात झाली आहेत.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून जानेवारीच्या सुरुवातीपासून युरोपीय देशांना निर्यात सुरू झाली आहे. सुमारे ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने नेदरलँड आणि हॉलंडला निर्यात होत आहे. युरोपच्या निर्यातीसाठी हिरव्या रंगाच्या थॉमसन, क्लोन टू, तास-ए-गणेश जातीच्या गोल द्राक्षांची गरज असते. युरोपला निर्यात होणाऱ्या द्राक्षांना चांगला दर मिळतो. त्यामुळे ही निर्यात आर्थिकदृष्ट्या जास्त फायदेशीर ठरते.
युरोपला निर्यात सुरू होण्यापूर्वीच अरब देश, चीन, श्रीलंका आणि रशियाला निर्यात सुरू झाली होती. चीनवगळता अन्य देशांना हिरव्या रंगाची आणि लांब द्राक्षे निर्यात होतात. प्रामुख्याने माणिक चमन, सुपर, एसएस, अनुष्का आणि सोनाका जातींच्या द्राक्षांची निर्यात होते. साधारण ७० ते ८० रुपये किलो दराने ही निर्यात सुरू आहे.
हेही वाचा >>>सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघातील सीमेवर असलेल्या कामांची अजित पवारांकडून पाहणी; म्हणाले, “मी…”
चीनली होणारी निर्यात यंदा सुरळीत आहे. करोना काळानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे निर्यात विस्कळीत झाली होती. या वर्षी चिनी आयातदार आणि देशातील निर्यातदारांनी शीतगृहांच्या तपासण्या पूर्ण केल्यामुळे चीनला होणारी निर्यात सुरळीत झाली आहे. चीन आणि चीनशेजारील आग्नेय आशियाई देशांतून जाड मण्यांच्या काळ्या रंगाच्या शरद, ज्योती, सरिता, कृष्णा जातीच्या द्राक्षांना मागणी असते. सध्या राज्यात काळ्या रंगाची द्राक्षे अपेक्षित प्रमाणात काढणीला आली नाहीत. साधारण १०० ते १३० रुपयांनी ही निर्यात सुरू आहे. जानेवारीअखेरीस चीनला होणारी निर्यात वेग घेण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>सरकारने सुटी दिली, विद्यापीठाची परीक्षा पुढे गेली
यंदा उच्चांकी निर्यात
सध्या राज्यात असलेले हवामान द्राक्ष पिकासाठी अनुकूल आहे. पुढील दोन-तीन महिने अनुकूल वातावरण राहिल्यास द्राक्ष निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी फक्त युरोपला ६,७९६ कंटेनरमधून ९०,४९३ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा पहिल्या १५ दिवसांत ३६४ कंटेनरमधून ४,८७० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. चांगले हवामान राहिल्यास यंदा उच्चांकी निर्यात होण्याचा अंदाज असून, मार्चपर्यंत निर्यात सुरू राहील, असा अंदाज राज्याचे कृषी मालाचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी व्यक्त केला आहे.
निर्यातीसाठी अनुकूल वातावरण
सध्या नाशिक, सांगलीतून युरोपला निर्यात सुरू आहे. प्रामुख्याने नेदरलँड, हॉलंड आणि रोमानियाला द्राक्ष निर्यात होत आहेत. श्रीलंका, चीन, सिंगापूर, मलेशिया, रशिया आणि अरब देशांना इंदापूर, नारायणगाव आणि सोलापूरमधून निर्यात होत आहे. यंदा निर्यातीसाठी अनुकूल वातावरण आहे, त्याचा फायदा द्राक्षउत्पादकांनी करून घ्यावा, असे आवाहन कृषी मालाचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी केले आहे.