पुणे: शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. दिवाळी सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांत रक्तदान शिबिरे पुन्हा सुरू झाल्याने रक्ताचा साठा वाढू लागला असला तरी परिस्थिती सुधारण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
अनेक रक्तपेढ्यांकडे दिवाळीच्या काळात रक्ताचा नवीन साठा जमा झालेला नाही. आधीच्या रक्तसाठ्यावर या रक्तपेढ्यांकडून सध्याची रुग्णांची गरज भागवली जात आहे. याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ.सोमनाथ खेडकर म्हणाले की, सध्या आमच्याकडे रक्ताच्या २७० पिशव्या आहेत. मागील दोन -तीन दिवसांपूर्वी रक्ताची मोठी टंचाई निर्माण झाली होती. परंतु, दरम्यानच्या काळात रक्तदान शिबिरे झाल्याने साठा वाढला आहे. आमच्याकडे दररोज ५० ते ६० पिशव्यांची आवश्यकता असते. त्यामानाने सध्या साठा कमी असला तरी तो पुरेसा आहे.
हेही वाचा… नियंत्रण कक्षातून कोयते घेऊन फिरणारे दिसले संशयित, पुणे पोलिसांची उडाली धावपळ, प्रत्यक्षात…
जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनीही रक्ताचा साठा कमी झाल्याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, दिवाळीच्या आधी आमच्याकडील दैनंदिन मागणी सुमारे ५० रक्तपिशव्या होती. त्या तुलनेने आमच्याकडे साठा पुरेसा होता. दिवाळीच्या काळात रक्तदान कमी झाल्याने अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पर्यायाने आमच्याकडील दैनंदिन मागणी १०० रक्तपिशव्यांवर पोहोचली. त्यातून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. आमचा भर आता छोटी रक्तदान शिबिरे घेण्यावर आहे. याबाबत अनेक कंपन्या आणि संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे.
सध्या आमच्याकडे साठा कमी असला तरी तो पुरेसा आहे. मागील तीन दिवसांत काही मोठी रक्तदान शिबिरे झाल्याने साठा वाढला आहे. रक्ताचा साठा वाढण्यासाठी आणखी शिबिरे होण्याची अथवा रक्तदात्यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. – डॉ.सोमनाथ खेडकर, प्रमुख, ससून रुग्णालय रक्तपेढी
अनेक रुग्णालयांकडून रक्ताला मागणी वाढली आहे. त्यामुळे नियमित रक्तदात्यांना संपर्क करून त्यांना रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. लोकांनी रक्तदानाला प्राथमिकता दिली तर दोन तीन दिवसांत परिस्थिती सुधारेल. रविवारपासून १०० जणांनी आमच्याकडे येऊन रक्तदान केले आहे. – डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी