पुणे : संविधान आणि लोकशाहीवर विश्वास असलेल्यांचा किंवा संविधान मानणाऱ्यांचा गळा घोटण्याचा प्रकार अलीकडच्या काळात होत आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर सोमवारी येथे केली. संविधान मानणाऱ्यांनी लोकशाहीला डाग लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कारांचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले यावेळी उपस्थित होते.
लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामासाठी तत्कालीन राज्य सरकारने ८७ कोटी महापालिकेला दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्मारकच्या जागेचे भूसंपादन शक्य झाले. स्मारकाचे काम यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेत दुसऱ्या विचारांच्या माणसांची सत्ता होती. त्यामुळे अनेक अडचणी आल्या. मात्र, आता स्मारकाचे काम मोठ्या स्वरूपात झाले पाहिजे. स्मारकासंदर्भात काही सूचना लक्षात आणून द्याव्यात. स्मारकाचे काम तातडीने करण्यासाठी महापालिका प्रशासकांकडे पाठपुरावा करावा लागणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.दानवे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली. अलीकडे सत्तेसाठी मरणारे आणि सत्ता असेल तरच जगणाऱ्या विचाराचे लोक आहेत. त्यामुळे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांची आवश्यता आहे.