लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी राज्यात शिक्षक भरती केली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे. मात्र संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षक भरती प्रक्रिया होणार असून, शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार शिक्षक भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल जाहीर होऊनही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांची संचमान्यता १५ मेपर्यंत अंतिम केली जाणार आहे.
हेही वाचा… पुणे : खडकीत २२ किलो गांजा जप्त; दोघे अटकेत
संचमान्यतेनंतर बिंदूनामावली प्रमाणित करणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद पवित्र संकेतस्थळावर करणे, पहिल्या तिमाहीसाठीच्या जाहिरातींनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, शिफारस करणे आदी प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत करण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पवित्र प्रणालीवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेतल्या जातील. तसेच पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल.
या पूर्वीच्या १२ हजार ७० पदांच्या भरतीत विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या एकूण १ हजार ५०० जागाही आता भरण्यात येणार आहे. त्या पदभरतीद्वारे एकूण ७ हजार ९०३ रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे.