पुणे: कामाच्या प्रामाणिकपणाची चुणूक दाखवीत स्वच्छ सहकारी संस्थेच्या औंध येथील पथकाने ‘व्ही कलेक्ट’ उपक्रमांतर्गत आलेली एक लाख २० हजार रुपये किमतीची चांदीची भांडी मालकाच्या स्वाधीन केली. स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या पथकाने नागरिकाचा शोध घेत चांदीची भांडी परत केली.
स्वच्छ संस्थेच्या वतीने शहराच्या विविध भागांत व्ही कलेक्ट हा उपक्रम राबविण्यात येत आहे. औंध येथील ब्रेमेन चौकातही सुटीचे दिवसवगळता सर्व दिवस या उपक्रमांतर्गत जुने कपडे, शोभेच्या वस्तू, भांडी, पादत्राणे, बॅग, पुस्तके स्वीकारली जातात. या उपक्रमांतर्गत अय्यपन हरिहरन यांनी एका जुन्या लोखंडी ट्रंकमध्ये वापरात नसलेली स्टीलची भांडी आणि अन्य वस्तू पुनर्वापरासाठी स्वच्छ संस्थेकडे दिल्या होत्या. त्यामध्ये एक लाख २० हजार रुपये किमतीची चांदीची भांडी असल्याची कल्पना त्यांना नव्हती.
वस्तूंचे वर्गीकरण करत असताना स्वच्छ संस्थेच्या कचरासेवकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी हरिहरन यांचा संपर्क क्रमांक मिळविला आणि खात्री करून चांदीच्या वस्तू त्यांच्या स्वाधीन केल्या.