पिंपरी : निगडी ते पिंपरी या विस्तारीत मार्गावर पुणे महामेट्रोचे काम सुरू झाले आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे मेट्रोचे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अडथळा ठरत असल्याने पुणे महानगर मार्ग परिवहन महामंडळ (पीएमपी) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे टर्मिनलमधील दोन फलाट तोडण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या ७.५ किलोमीटर अंतरावर मेट्रो धावत आहे. पुणे महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेचा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत विस्तार केला जात आहे. निगडीत पहिला खांब उभारण्याचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या कामासाठी निगडी ते पिंपरीपर्यंत अनेक ठिकाणी सुरक्षाकठडे लावण्यात आले आहेत. कामास अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येत आहेत. तसेच दिव्यांचे खांब व वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) हटविण्यात येत आहेत.
हेही वाचा >>>घातक लेझर झोतांचा वापर करणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात – पोलिसांकडून चार मंडळांविरुद्ध गुन्हे
मेट्रो स्थानकाच्या कामात निगडी येथील पीएमपीएलच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे टर्मिनलमधील फलाटांचा अडथळा निर्माण होत आहे. तेथे एकूण पाच फलाट आहेत. त्यापैकी दोन फलाट तोडण्यात येणार आहेत. स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामेट्रो पुन्हा फलाट बांधून देणार आहे. दोन फलाट तोडण्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.
वाहतुकीस अडथळा
निगडीतून पुण्यासह सर्व मार्गावर पीएमपीएलच्या बस सुटतात. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. पत्राशेड लावून मेट्रोचा खांब उभारण्यात येत आहे. जागा कमी झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
मेट्रो स्थानकास अडथळा ठरत असल्याने पीएमपीएलच्या टर्मिनलमधील दोन फलाट तोडण्याची परवानगी दिली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रशासन फलाट उभारुन देणार आहे. त्यांनी न उभारल्यास महापालिका उभारेल आणि मेट्रोकडून पैसे वसूल केले जातील, असे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.