पुणे: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह सात जणांना अटक केली आहे.
अरुणा किशन गायकवाड (वय ४०, रा. नुराणी गल्ली, ता. जामखेड, जि. अहमदनगर), ऋषीकेश बंडू जाधव (वय २२, रा. गांधीनगर, नूर काॅलनी, बीड), अनिल उत्तम पवार (वय २२, रा. नवगण राजुरी, जि. बीड), सचिन श्रीमंत गुंजाळ (वय ३५, रा. खडक देवळा, जि. बीड), शंकर सर्जेराव गायकवाड (वय ३४, रा. नाळवंडी नाका, जि. बीड), मिलिंद वसंत शिंदे (वय २०, रा. शताब्दीनगर, छत्रपती संभाजीनगर), नितेश रमेशराव बोघणकर (वय ३४, रा. पिंपळगाव, जि. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा… पुणेकरांना खुशखबर! मेट्रो लवकरच रामवाडीपर्यंत धावणार
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सोमवारी (१ जानेवारी) राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी गर्दी केली होती. पेरणे फाटा परिसरात बसमध्ये प्रवेश करणाऱ्या अनुनायांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिसांनी तपास करून सातजणांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत (५ जानेवारी) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लाेणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, गजानन जाधव, शिरीष भालेराव यांनी ही कारवाई केली.