पुणे : प्रेयसीच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह प्रेयसीच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगेश सुरेश जाधव (वय ३१, रा. मंतरवाडी, हडपसर-सासवड रस्ता) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मंगेशने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) पोलिसांनी जप्त केली आहे.
प्रेयसी आणि तिच्या पतीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे जाधव याने चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रेयसी आणि तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगेशचे वडील सुरेश मारुती जाधव (वय ५३, रा. पांडुरंगवाडी, कल्याण, जि. ठाणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश खासगी कंपनीत सुरक्षारक्षक होता. तो विवाहित आहे. मंगेशचे घराशेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेशी प्रेमसंबंध जुळले. महिलेच्या पतीला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले.
हेही वाचा >>> पुणे : जंगली महाराज रस्त्यावर फुगे विकणारी तीन मुले बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा
त्यानंतर तिने मंगेशच्या मोबाइलवर संपर्क साधला. ती मंगेशच्या परभणी जिल्ह्यातील मूळगावी आली. पत्नी माहेरी नसल्याचे उघडकीस आल्यानंतर पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.पोलिसांनी तिला मंगेशच्या गावातून शोधून काढले. त्या वेळी तिने मी मंगेशबरोबर राहणार असल्याचे पोलिसांना लिहून दिले होते. त्यानंतर ती पुन्हा मंतरवाडी परिसरात आली. मंगेश आणि प्रेयसी एकत्र राहत होते. प्रेयसी तिच्या पतीच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर मंगेश आणि तिच्यात वाद झाला. प्रेयसीच्या पतीने मंगेशला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मंगेशची प्रेयसी त्याला न सांगता घरातून बाहेर पडली. मंगेशने या प्रकाराची माहिती त्याच्या आईला दिली. त्यानंतर त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करत आहेत.