पुणे : राज्याच्या कुस्ती क्षेत्रात प्रतिष्ठेची असणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा उद्या मंगळवारपासून पुण्यात सुरू होत आहे. स्पर्धेसाठी मातीचे आखाडे आणि मॅट सज्ज झाली असून, मैदानाबाहेर स्पर्धेच्या मान्यतेवरून वेगळाच आखाडा रंगत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विजेत्या मल्लास मानाची गदा प्रदान करण्याची मोहोळ कुटुंबीयांची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र केसरी किताबाची लढत जिंकणाऱ्या मल्लास मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने चांदीची गदा प्रदान करण्यात येते. ही गदा १९६१ च्या पहिल्या स्पर्धेपासून देण्यात येते. १९८२ पर्यंत ही गदा राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दिली जात होती. त्यानंतर मात्र आजपर्यंत ही गदा मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने दिली जाते. यावेळी या स्पर्धेस राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे गदेची परंपरा खंडित होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती.

हेही वाचा – पुणे: सरसंघचालकांच्या विनयशीलतेचे पुणेकरांना दर्शन

माजी खासदार अशोक मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी परंपरा खंडीत होणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘स्पर्धा होणार असल्याने आमच्या कुटुंबीयांच्या वतीने ही गदा विजेत्या मल्लाला देण्यात येईल. उद्या सकाळीच ही गदा आमच्यापर्यंत पोहोचणार असून, त्याचे विधीवत पूजन झाल्यावर ती स्पर्धा संयोजकांकडे सुपुर्द करण्यात येईल’.

राज्य कुस्तीगीर परिषदेसंदर्भात वाद का निर्माण झाले माहित नाही. हे दुर्दैवी आहे. पण, मामासाहेब मोहोळ यांनी या परिषदेची स्थापना केली आणि विशेष म्हणजे, देशातील एखाद्या खेळाची ही पहिली राज्य संघटना होती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणूनच ही गदा मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने आम्ही देत असतो. या वेळी तर स्पर्धेचे आयोजन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले आहे. त्यामुळे मोहोळ कुटुंबीयांना मिळालेले आयोजन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच या वेळीही ही गदा विजेत्या मल्लास देण्यात येईल, असे मोहोळ म्हणाले.

हेही वाचा – पुणे : पोलीस विभागातच चोरी करणारा गजाआड

अशी आहे गदा

गदेची उंची २७ ते ३० इंच, तर व्यास ९ ते १० इंच असतो. गदा १० ते १२ किलो वजनाची असते. ही गदा सागाच्या लाकडापासून तयार होते आणि त्यावर चांदीच्या पत्र्यावरील कोरीव काम केलेले असते. गदेच्या मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते. ही गदा गेली तीन दशकाहून अधिक काळापासून पंगांठी कुटुंबीयच बनवत आहेत.