लोहगांव आणि धानोरी परिसराला जोडणाऱ्या विकास आराखड्यातील रखडलेल्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोरवाल रस्त्याला समांतर आखण्यात आलेल्या २४ मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्यासाठी मार्थोपोलिस या खासगी शाळेने जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वेग मिळणार असून वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : जी-२० बैठकीसाठी साठ चौकांचे सुशोभीकरण ; महापालिका घेणार बांधकाम व्यावसायिक, संस्थांची मदत
पोरवाल रस्ता परिसरात मागील पाच ते सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांची संख्या वाढली आहे. धानोरी जकात नाक्याजवळील अरुंद रस्त्यावरून वाहनांची ये-जा चालू आहे. याच मार्गावरून चऱ्होली, आळंदी आणि पिंपरी-चिंचवडकडे वाहने जात असल्याने या रस्त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांची प्रचंड कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी पोरवाल रस्त्याला समांतर असा कलम २०५ अंतर्गत पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला होता.महापालिका प्रशासनाने धानोरी सर्वेक्षण क्रमांक १२, १४, १५ आणि १७ मधून २४ मीटर रुंदीचा कलम २०५ अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा आणि मुख्यसभेत मंजूर केला होता. परंतु या पर्यायी रस्त्यांवर असलेल्या मार्थोपोलिस या शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते.
हेही वाचा >>>उपाहारगृह भाडेतत्वावर देण्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक
यासंदर्भात वडगांवशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम रखडल्याने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला हाेता. यासंदर्भात टिंगरे यांनी शाळेचे पदाधिकारी आणि आयुक्तांची एकत्रित बैठक घेऊन जागा हस्तांतरित करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळेला पत्र पाठविले. त्यावर शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे आता या नवीन रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात होऊन पोरवाल रस्त्याच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.