पुणे : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून ‘बहुविद्याशाखीय केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या अंतर्गत बहुविद्याशाखीय ज्ञान निर्मिती, संशोधनावर भर दिला जाणार असून, श्रेयांक आधारित अभ्यासक्रम राबवले जातील. पुढील शैक्षणिक वर्षापासून बहुविद्याशाखीय केंद्र कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
सध्याच्या प्रचलित एकल विषयाच्या ज्ञानात्मक मर्यादा ओलांडून अनेक विषयांचे ज्ञान एकत्र करून समस्यांवर उपाय शोधणे हा या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश आहे. तसेच आंतरविद्याशाखीय ज्ञान निर्मिती करणे, या ज्ञानाचे समस्या निराकरणासाठी उपयोजन करणे, कोणत्याही एका विद्याशाखेत अडकून न पडता विविध विद्याशाखांच्या ज्ञानांचे एकत्रीकरण, बहुविद्याशाखीय ज्ञान निर्मिती, उपयोजन यासाठीचे संशोधक निर्माण करणे या केंद्राची उद्दिष्टे असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
जगातील कोणतीही समस्या एका ज्ञानाआधारे सोडवता येत नाही. विविध विषयांची त्यासाठी गरज असते. त्यामुळे विविध क्षेत्रातील, विद्याशाखांतील तज्ज्ञांना बहुविद्याशाखीय केंद्राअंतर्गत एकत्र आणण्यात येणार आहे. त्याद्वारे तंत्रज्ञान, भाषा, माहितीशास्त्र, संप्रेषण अशा विविध विद्याशाखांशी संबंधित अभ्यास, संशोधन करणे या केंद्राद्वारे शक्य होणार आहे. या केंद्रासाठी अभ्यास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचेही डॉ. सोनवणे यांनी नमूद केले.
क्रेडिट हाउस
बहुविद्याशाखीय केंद्राअंतर्गत राबवले जाणारे अभ्यासक्रम कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना करता येतील. त्यासाठी क्रेडिट हाउस ही संकल्पना राबवली जाईल. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठीचे श्रेयांक मिळतील, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.