भाजपाच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत जगताप कुटूंबियांचा उमेदवार असणार असून त्यांना भरगोस मतांनी विजयी करायचे आहे. हीच खरी श्रद्धांजली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना असेल असे आवाहन भाजपाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना करण्यात आले. जुनी सांगवीत भाजपाची आढावा बैठक पार पडली. यात माजी महापौर माई ढोरे, दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासह इतर महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकतेच निधन झाले असून चिंचवड पोटनिवडणूक लागली आहे. अद्याप भाजपाकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपाकडून लक्ष्मण जगताप कुटुंबातील अश्विनी लक्ष्मण जगताप किंवा बंधू, शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच आता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. स्वतः शंकर जगताप हे आढावा बैठकीला हजेरी लावत असून कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. आज जुनी सांगवीत भाजपाची आढावा बैठक पार पडली. २०१९ ला दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला होता. अशी आठवण पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना करूम दिली. सांगवी, जुनी सांगवीवर दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे खूप प्रेम होते. त्यांनी सांगवी भागात अनेक समाजोपयोगी कामे केलीत. त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे.
चिंचवड पोटनिवडणूकीत जगताप कुटुंबीयांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असून राहुल कलाटे यांचा एक लाख मतांनी पराभव करायचा आहे. हीच खरी श्रद्धांजली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना असेल असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अद्याप महाविकास आघाडी कडून निवडणूकीच्या रिंगणात कोण उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतु, राहुल कलाटे हेच विरोधक उमेदवार असणार असल्याचा अंदाज भाजपाने व्यक्त केला असून त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.