पुणे : गर्दीच्या ठिकाणांवरुन मोबाइल संच चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा का मोबाइल संच चोरीला गेला तर परत मिळण्याची शाश्वती नसते. विश्रांतवाडी पोलिसांनी तपास करून तक्रारदारांचे गहाळ, तसेच चोरीला गेलेले मोबाइल संच तांत्रिक तपास करून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आणि कर्नाटकातून शोधून काढले. नागरिकांना सोमवारी गहाळ झालेले मोबाइल संच परत करण्यात आले. राखी पौर्णिमेच्या दिवशी तक्रारदारांना मोबाइल संच परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रवासात, बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे मोबाइल संच गहाळ होतात. गर्दीत चोरटे मोबाइल चोरतात. मोबाइल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर नागरिक तक्रार करतात. विश्रांतवाडी पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाइलची यादी तयार केली. आयएमईआय मोबाइल क्रमांकावरुन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. चोरट्यांनी मोबाइलची परराज्यात विक्री केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मोबाइल वापरणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधला. मोबाइल परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गहाळ झालेले मोबाइल वापरणाऱ्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मोबाइल संच जमा केले.
हेही वाचा >>>पुणे : महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पावले!
त्यानंतर पोलिसांनी तक्रारदारांशी संपर्क साधून खात्री केली. मोबाइल सापडल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल संच परत करण्यात आले. उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, शंकर साळुंके, तपास पथकाचे उपनिरीक्षक नितीन राठो़ड, बबन वणवे, यशवंत किर्वे, वामन सावंत, अमजद शेख, संपत भोसले, संजय बादरे, संदीप देवकाते, किशोर भुसारे, अक्षय चापटे यांनी ही कामगिरी केली.
मोबाइल हरविल्यानंतर नागरिकांनी पुणे पोलिसांच्या ‘लाॅस्ट अँड फाऊंड’ संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.