पिंपरी : मोशीतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या ७०० टन क्षमतेच्या प्रकल्पामधून प्रतिदिन १२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यातून १४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करणे हा उद्देश या प्रकल्पाच्या माध्यमातून साध्य होत असून महापालिकेच्या खर्चातही बचत करणारा हा प्रकल्प ठरत असल्याचा दावा आयुक्त शेखर सिंह यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या दैनंदिन सुमारे १ हजार १५० मेट्रिक टन कचऱ्यावर मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. त्यातील ७०० मेट्रिक टन कचऱ्यापासून १४ मेगावॅट वीजनिर्मिती करणे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपनुसार विकसित केला गेला असून त्यांच्यामार्फत २१ वर्षे कालावधीसाठी चालवला जाणार आहे. कार्बन उत्सर्जन निरीक्षण कार्यप्रणालीचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे ७ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखले जाणार आहे.

हेही वाचा – पुणे: मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील दोघे पडले… विचारपूस सुरू असताना दोघांनी मोटारच पळवून नेली

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविण्यासाठी सुमारे २ मेगावॅट वीज लागत आहे. उर्वरित वीज महापालिकेच्या जलशुद्धीकरण, मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येत आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी चिखली येथील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केलेल्या पाच एमएलडी पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची बचतही होत आहे. वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सहाय्याने १७ ऑक्टोबरपर्यंत एकूण २२.८८ लाख युनिट वीज निर्मिती केली गेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ६ ऑक्टोबर रोजी मान्यतेचे प्रमाणपत्रही या प्रकल्पाला दिले आहे.

हेही वाचा – पुणे: ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत; विनय अऱ्हानासह तिघांना पोलीस कोठडी

या प्रकल्पाच्या आधारे केवळ कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. तर यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्येही भरीव बचत होत आहे. – शेखर सिंह, आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The waste to power plant in moshi is generating 12 megawatts of electricity per day ggy 03 ssb