पुणे : शहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीची वेळ हेतूपुरस्कर चुकीची दिल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी शनिवारी केला. जलसंपदा विभागाने धंगेकर यांना पत्र पाठवून बैठकीची वेळ सायंकाळी ५.५० वाजताची दिली होती. मात्र, धंगेकर वेळेवर बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर केवळ १५ मिनिटांत बैठक संपली. त्यामुळे जलसंपदाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबतचा खुलासा मागवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे, असेही धंगेकर यांनी सांगितले.
कुकडी, घोड, नीरा, खडकवासला, भामा आसखेड, पवना, चासकमान आणि खडकवासला अशी विविध कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बोलाविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदारांना उपस्थितीत राहण्याबाबत जलसंपदा विभागाकडून पत्र पाठवून निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार आंबेगाव मतदार संघाचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, तसेच शहरातील कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. मात्र, धंगेकर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात ५.५० मिनिटांची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार धंगेकर साडेपाच वाजता शासकीय विश्रामगृहात बैठकस्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले. लवकर बैठक आटोपल्यामुळे धंगेकर यांनी नाराजी बोलून दाखविली.
हेही वाचा >>> Weather Update: राज्यभरात पावसाचे पुनरागमन; आगामी ४८ ते ७२ तासांत जोरदार पावसाचा अंदाज
एवढ्या कमी वेळेत बैठकीत निर्णय घेतले जातात. त्यामुळे पालकमंत्र्यांचा पाण्याचा अभ्यास दांडगा असल्याचे शनिवारी दिसून आले. पालकमंत्री पाटील हे जाणीवपूर्वक पुण्याच्या पाण्याबाबत बोलणे टाळत आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही बोलणे टाळले, लपवाछपवी केली, तरी पुणेकरांच्या समस्यांबाबत मी आवाज उठवून मतदारसंघातील नागरिकांना न्याय देण्यासाठी तत्पर आहे. कालवा समितीच्या बैठकीबाबत पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आणि चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांच्याकडून खुलासा मागवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. – रवींद्र धंगेकर, आमदार, कसबा मतदारसंघ