पुणे शहराला वर्षभर पुरेल एवढे पाणी यंदाच्या हंगामात मुठा नदीत सोडण्यात आले आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नदीत सोडण्यात आले आहे. एवढे पाणी महानगरपालिकेकडून वर्षभर पुणेकरांसाठी देण्यात येते. दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत पाऊस सुरूच असून खडकवासला धरणातून मुठा नदीत ६८४८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : प्रारूप आराखड्यावरील सुनावणीला ३३ हजार नागरिकांची उपस्थिती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण २९.१० टीएमसी म्हणजेच ९९.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या चारही धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणात ४० मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात २० मि.मी., पानशेत धरण परिसरात १८ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. खडकवासला धरणातून मुठा नदीत १९२९ क्युसेकने मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात येत होते. पावसाचे प्रमाण वाढल्याने सकाळी ११ नंतर हा विसर्ग ३४२४ क्युसेकने वाढविण्यात आला. वरसगाव धरणातून १४५८ क्युसेकने, तर पानशेत धरणातूनही ९७७ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी एक वाजल्यानंतर ४२८० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३५ मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात २६ मि.मी. आणि २७ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात आठ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यानंतर हा विसर्ग ५१३६ क्युसेक, तर सहा वाजल्यानंतर ६८४८ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे : हडपसरमध्ये मैत्रिणींची आत्महत्या ; एकीने गळफास घेतला, दुसरीची इमारतीतून उडी

दरम्यान, शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. त्यानुसार वर्षभरात महापालिकेकडून १६ ते १७ टीएमसी पाणी धरणातून घेण्यात येते. त्यानुसार यंदाच्या हंगामात खडकवासला धरणातून आतापर्यंत १६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहराला वर्षभर पुरेल एवढे पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

१३ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, भामा आसखेड, आंद्रा, खडकवासला, नाझरे, वीर आणि उजनी अशी १३ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Story img Loader