राज्यातील यंदाचा उसाचा गळीत हंगाम नेमका कधी सुरू होणार, या विषयीची अनिश्चितता वाढली आहे. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्री समितीची बैठक होऊन गळीत हंगाम कधी सुरू होणार, या विषयीची तारीख जाहीर केली जात असे. यंदा अद्याप मंत्री समितीची बैठकच झाली नसल्यामुळे कारखाने, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांमध्ये हंगाम कधी सुरू होणार, या विषयीची अनिश्चितता वाढली आहे.
राज्यातील साखर उद्योगाची एकूण आर्थिक उलाढाल १.०८ लाख कोटींवर गेली आहे. मागील वर्षी कारखान्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी १७५० कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दिला आहे. त्या शिवाय ३००० कोटींचा राज्य उत्पादन शुल्क भरले आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या या उद्योगाचा यंदाचा गळीत हंगाम कधीपासून सुरू करणार हे अद्याप निश्चित होत नाही. त्यासाठीची मंत्री समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. कारखानदारांनी हंगामाची तयारी केली आहे. ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांशी करार केले आहेत. तरीही हंगामाची सुरुवात कधी होणार, हे निश्चित नसल्यामुळे अनिश्चितता वाढली आहे.
हेही वाचा >>>“ललित पाटील तुमच्या ताब्यात होता, त्याला नीट सांभाळता आलं नाही”, न्यायालयाने पुणे पोलिसांना सुनावले
राज्यातील खासगी साखर कारखान्यांच्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) १५ ऑक्टोबरपासून यंदाचा गळीत हंगाम सुरू करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. आता हंगाम दसऱ्यानंतर एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची आणि दिवाळीनंतर गती येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली आहेत. एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. कारखान्यांनी गाळपाची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.