पुणे: पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतून जाणाऱ्या ६५ मीटर वर्तुळाकार बाह्यवळण मार्गाचे (पुणे इनर रिंगरोड) काम पीएमआरडीएकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. या मार्गिकेतील पहिला टप्पा सोलू ते वाघोली हा प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते नगर रस्ता जोडला जाणार आहे. परिणामी शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
सोलू ते वडगाव शिंदे हा वर्तुळाकार रस्त्याचा भाग (पुणे महापालिका हद्दीपर्यंत) पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणार आहे. तर, पुणे महापालिका हद्दीतील लोहगाव ते वाघोली-वडगाव शिंदे हा ५.७० किलोमीटर वर्तुळाकार रस्त्याचा भाग पुणे महापालिका विकसित करणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए हद्दीतील वर्तुळाकार रस्त्याचा उर्वरित भाग (६५० मीटर लांबी) ६५ मीटर रुंदीने आणि प्रादेशिक आराखडामधील ६५० मीटर लांबीचा ९० मीटर रुंद प्रादेशिक रस्ता हा पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणार आहे. हा प्रादेशिक आराखड्यातील रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून स्पाईन रस्त्याद्वारे पठारे चौक चऱ्होली हद्द व तेथून निगडी येथे जुन्या पुणे मुंबई रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक सुगम होणार आहे.
हेही वाचा >>> पुणे: महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट; महामेट्रो, महापालिकेकडून आराखडा तयार
तसेच तो हिंजवडीला जाणारा पर्यायी रस्ता वाघोली-लोहगाव-आळंदी-मोशी-निगडी-पुनावळे-हिंजवडी असा होऊ शकतो. या रस्त्याचे काम झाल्यास हा ९० मी. रुंदीचा रस्ता पुणे-नगर रस्त्याला जोडला जाणार आहे. परिणामी शहरांतर्गत वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. सद्य:स्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रादेशिक आराखड्यातील रस्त्याचे मोशी पांजरपोळ चौक ते चऱ्होलीपर्यंत एकूण ९.५० कि.मी. विकसनाचे काम ३० मी. रुंदीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरू असून जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. याच धर्तीवर पीएमआरडीएकडील ६५० मी. रस्त्याची लांबी ३० मी. रुंदीने विकसित करण्यात येणार आहे.