भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना मानवंदना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पाच तरूणांनी साडेआठ हजार किलोमीटरचा दुचाकीवर प्रवास करणार आहेत. वैभव रहाटे, राहुल मोकाशी, संदीप कटके, राहुल हंकारे, महेंद्र शेवाळे असे या तरुणांची नावे आहेत. पुणे ते अरुणाचल प्रदेशमधील काहो ते परत पुणे असा हा नियोजित प्रवास आहे. भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी झेंडा दाखवून त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते प्रवासासाठी रवाना झाले.
हेही वाचा- पुणे-नगर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गाच्या कामाला वेग; भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती
नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिम राबवाव्यात, असे मत जगताप यांनी व्यक्त केले. माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, विनायक गायकवाड आदी उपस्थित होते. या पाच तरुणांनी २०१९ मध्ये कन्याकुमारी ते लडाख ते पुणे असा प्रवास केला होता. तेव्हा पर्यावरणाला धोका असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नका, असा संदेश त्यांनी प्रवासात दिला होता.