पुण्यातील नाटय़गृहांकडे रसिकांची पाठ; तिकिटांच्या दरवाढीचा परिणाम
एकीकडे पुण्यामध्ये उदंड झाली नाटय़गृहे, अशी स्थिती असताना नाटय़रसिकांची संख्या मात्र रोडावताना दिसून येत आहे. नाटकांचे वाढलेले दर हे त्यामागचे कारण असून काही नाटकांचा अपवाद वगळता ‘गेले प्रेक्षक कुणीकडे?’ असे विचारण्याची वेळ आली आहे. रंगभूमी दिन शनिवारी (५ नोव्हेंबर) साजरा होत असताना नाटय़ व्यावसायिकांची मातृसंस्था असलेली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद या विषयात काही ठोस पावले उचलणार आहे की नाही हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला. हा मराठी रंगभूमीचा उदय मानला जातो. तेव्हापासून ५ नोव्हेंबर हा ‘रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी रसिकांचे मनोरंजन हा नाटकाचा उद्देश असला तरी रंगभूमीची सध्याची अवस्था पाहता नाटक कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाटक हे प्रेक्षकांसाठी आहे की त्याचा व्यवसाय झाला, हा गुंता या क्षेत्रातील मंडळींना सोडविता आलेला नाही. त्यामुळे नाटकाच्या तिकिटाचे दर भरमसाट वाटावेत एवढे वाढले आहेत. या पाश्र्वभूमीवर नाटय़वेडा मराठी प्रेक्षक आता नाटकाकडून चित्रपट पाहण्याकडे वळला आहे, याकडे संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी लक्ष वेधले. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने यासंदर्भात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशीही मागणी केली आहे. मराठी रंगभूमीवर सध्या ‘कोडमंत्र’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळय़ाकाठी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकांसह प्रशांत दामले यांची भूमिका असलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ आणि ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकांना प्रेक्षकांची चांगली गर्दी होत आहे. मात्र, तरीही प्रयोगाच्या वेळी नाटय़गृहावर ‘हाऊसफुल्ल’चा फलक हा गेल्या काही वर्षांत लागलेला नाही, अशी माहिती नाटय़व्यवस्थापक प्रवीण बर्वे यांनी दिली. एवढेच नव्हे, तर रंगमंदिराची बाल्कनी उघडण्याची वेळ क्वचितच येते, असेही ते म्हणाले.