पुणे : पीएमपी प्रवासी महाविद्यालयीन युवतींची दोघांनी छेड काढली. छेड काढल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिला वाहकासह प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की करून दोघेजण पसार झाल्याची घटना येरवडा भागात घडली. पोलिसांकडून पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत युवतीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी आणि तिची मैत्रीण महाविद्यालयातून पीएमपी बसने घरी निघाल्या होत्या. युवतींचा पाठलाग करून दोघेजण बसमध्ये शिरले. बस प्रवासात दोघांनी युवतींची छेड काढली. त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बसमधील महिला वाहक आणि ज्येष्ठाने दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना धक्काबुक्की करुन दोघे जण येरवड्यातील नागपूर चाळ बसथांब्यावर उतरले.
युवती बसमधून उतरल्यानंतर त्यांनी रस्त्यात पडलेला दगड उचलला. तेव्हा दोघांनी त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली. दोघे जण पसार झाले. घाबरलेल्या युवतीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सोळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक देवकर तपास करत आहेत.
हेही वाचा: पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पकडले, खंडणी विरोधी पथकाची कारवाई
रिक्षाचालकाकडून प्रवासी मुलीची छेड
रिक्षाचालकाने एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. याबाबत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, रिक्षाचालक गाेविंद हनुमंत नेनावत (वय २३,रा. मानाजी नगर, नऱ्हे) याच्याविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मुलगी बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे भागातून रिक्षातून निघाली होती. मुलगी रिक्षात एकटीच असल्याचे पाहून रिक्षाचालक नेनावत याने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. कोलकाता शहरात झालेल्या घटनेप्रमाणे अत्याचार करू, अशी धमकी देऊन रिक्षाचालक पसार झाला. घाबरलेल्या मुलीने घरी पोहचल्यानंतर या घटनेची माहिती आईला दिली.
हेही वाचा: पुणे : कामशेत परिसरात ५७ लाखांचा गांजा जप्त, चौघे अटकेत
खराडी भागात युवतीचा विनयभंग
खराडी भागात पीएमपी थांब्यावर थांबलेल्या युवतीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. तक्रारदार युवती बसने घरी निघाली होती. त्यावेळी दोघांनी तिचा पाठलाग करून विनयभंग केला. याप्रकरणी संदीप परमेश्वर वरखड (वय २८, रा. हडपसर), विष्णू विट्ठल शिंदे (वय २७, रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पाेलिसांनी गु्न्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केली.
© The Indian Express (P) Ltd