लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विमानाने येऊन शहरातील मॉलमधून महागडे कपडे, पादत्राणे चोरी करणाऱ्या राजस्थानातील चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून चार लाख १७ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने देशातील विविध शहरांत चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गौरवकुमार रामकेश मीना (वय १९), बलराम हरभजन मीना (वय २९), योगेशकुमार लखमी मीना (वय २५), सोनूकुमार बिहारीलाल मीना (वय २५, सर्व रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. योगेशकुमार टोळीप्रमुख आहे. राजस्थानातील चोरट्यांच्या टोळीने देशातील विविध शहरांतील मॉलमध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. येरवडा भागातील संगमवाडी परिसरातील एका मॉलमध्ये दोघा आरोपींनी केली होती. चोरी करून बाहेर पडताना मॉलमधील अलार्म वाजल्याने सुरक्षारक्षाकांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचा साथीदार पसार झाला होता. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तांत्रिक विश्लेषणात आरोपींची नावे निष्पन्न झाली.
आणखी वाचा-यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
आरोपींना खडकी बाजार परिससरातील एका हॉटेल, तसेच पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांकडून महागडे कपडे, पादत्राणे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांनी ही कारवाई केली.