रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड करून थांबलेल्या रेल्वेगाडय़ांमध्ये शिरून प्रवाशांकडील ऐवज चोरणाऱ्या चोरटय़ांना रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) अटक करण्यात आली.

रोहित गणेश रारेभात, बाबू मोहन कसबे, विनोद सखाराम जाधव (तिघे रा. जामखेड, जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत चोऱ्यांचे प्रकार घडले होते.

रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्यानंतर थांबलेल्या रेल्वे गाडीत चोरटे शिरायचे. प्रवाशांकडील ऐवज लांबवून चोरटे पसार व्हायचे. सातारा भागात पळशी रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेची वायर कापून चोरीची घटना घडली होती.

रेल्वे सुरक्षा दलाचे (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) वरिष्ठ विभागीय आयुक्त डी. विकास, सहायक सुरक्षा आयुक्त बी. के. मकारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफच्या पथकाकडून याप्रकरणाचा तपास सुरू होता. तीन ते चार महिन्यांत सिग्नल यंत्रणेत बिघाड करण्याच्या ३६ घटना घडल्या होत्या.

तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार चोरटे गुन्हा केल्यानंतर दुचाकीवरून पसार व्हायचे. नाशिक, सातारा येथील आरपीएफच्या पथकाने तपास करून सिग्नल यंत्रणेत बिघाड करताना आरोपी रारेभात, कसबे, जाधव यांना नुकतेच पकडले. त्यांच्याकडून मोटार, दुचाकी तसेच सिग्नल यंत्रणेत बिघाड करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरीसाठी रेल्वे अ‍ॅपची मदत

सिग्नल यंत्रणेत बिघाड करून थांबलेल्या रेल्वे गाडय़ांमध्ये चोरी करणारे चोरटे रेल्वे अ‍ॅपद्वारे रेल्वेगाडय़ांची माहिती घ्यायचे. या अ‍ॅपमध्ये कोणत्या मार्गावरून रेल्वे जाणार आहे, याची माहिती असायची. सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्यानंतर लाल दिवा दिसल्यानंतर चोरटे डब्यात शिरायचे. गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांकडून ऐवज लांबवून ते पसार व्हायचे.