मार्केट यार्डातील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे गाळ्यांवरून शेतीमाल चोरीस जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सुरक्षारक्षकांच्या मुजोरीमुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील बाजार घटकांना त्रास सहन करावा लागत असून बाजार आवारातील अडते तसेच खरेदीदारांनी याबाबत तक्रारी केल्या असून मार्केट यार्डात सुरक्षारक्षकांची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी बाजार समितीकडून ‘मेस्को’ (महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ) या संस्थेच्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाजार आवारात सुरक्षारक्षक नेमण्यात आल्यानंतर बाजार आवारात चोऱ्या होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. सुरक्षाव्यवस्थेवर पैसे खर्च करूनही गाळ्यांवरील शेतीमालाच्या चोऱ्या कमी झालेल्या नाहीत, त्यामुळे अडत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मार्केट यार्डातील बाजार आवारात सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत गर्दी असते. त्यानंतर बाजार आवारातील गर्दी कमी होती. सायंकाळी बाजार आवारात फारसे कोणी नसते. शेतीमालाची आवक रात्री सुरू होते.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड महापालिकेची चाळिशी ; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराकडे वाटचाल
दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत बाजार आवारात गर्दी कमी असल्याची संधी साधून चोरटे शेतीमाल लांबवितात. बाजार आवारात सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी बसविल्यास चोऱ्या कमी होतील. दुपारच्या वेळेत बाजारात सुरक्षारक्षकांनी गस्त घालावी, अशी मागणी अडत्यांकडून करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांकडून खरेदीदारांशी वाद घातले जातात. बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>>निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल चिन्ह; पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा
बाजार समितीने नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक गस्त घालत नाही. आमचे काम फक्त प्रवेशद्वारावर थांबण्याचे आहे. बाजार आवारात गस्त घालण्याचे काम आमचे नाही, असे सुरक्षा रक्षक सांगतात. सुरक्षारक्षकांच्या निष्क्रियतेमुळे बाजारातील चोऱ्या वाढल्या आहेत.– करण जाधव, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटना
बाजार आवारातील काही जणांकडून दादागिरीची भाषा केली जाते. त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि त्यांच्यात वाद होतात. विनाकारण अरेरावी करू नका, अशा सूचना सुरक्षारक्षकांना देण्यात आल्या आहेत. बाजार आवारातील गस्त वाढविण्यात आली आहे.– मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती