लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पादचारी तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन माग काढून चोरट्याला ताब्यात घेण्यात आले. चोरट्याकडून अडीच लाख रुपयांचे दहा महागडे मोबाइल संच जप्त करण्यात आले.
तन्मय पृथ्वीराज भैसडे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत संदीप राठोड (वय २४, रा. आनंदनगर सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप राठोड हे २७ डिसेंबर रोजी सायंकाळी घरी निघाले होते. बिबवेवाडी भागात चार जण एका तरुणाला मारहाण करत होते. संदीप तेथे गेले. तेव्हा त्यांना टोळक्याने मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाइल संच चोरुन नेला. एकाने संदीप यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषणातून पोलिसंनी आरोपी भैसडे याची माहिती मिळवली. तपासात त्याने दहा मोबाइल संच चोरल्याची माहिती मिळाली. त्याने बिबवेवाडी परिसरात मोबाइल चोरीचे दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
आणखी वाचा-खबरदार! कामात कुचराई तर कारवाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा?
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक विवेक मिसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, संजय गायकवाड, संतोष जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, नितीन धोत्रे, सुमीत ताकपेरे, ज्योतिष काळे यांनी ही कामगिरी केली.