“आम्ही महिला धोरण राबवले आणि काही नवे कायदे केले. या कायद्याचे स्वागत झाले असे नाही. सुरुवातीच्या काळात याला छुपा विरोध झाला. मात्र, हे महिला धोरण आता संपूर्ण देशाने स्वीकारले, असं उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. ते पुण्यात यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित केलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. “नारी शक्तीच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा असा हा आजचा सोहळा आहे. गेल्या काही वर्षांपासून यशस्विनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपले सहकारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की कर्तृत्वाचा वारसा हा केवळ पुरुषांकडे नाही. संधी मिळाली तर कर्तृत्व गाजवण्याबाबत मुली किंवा स्त्रिया कधीही कमी पडत नाहीत”, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >> शिवसेनेतील बंडखोरीनंतर भरसभेत रडणारे संतोष बांगर नंतर शिंदे गटात का गेले? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?
“आम्ही महिला धोरण ठरवले आणि काही नवे कायदे केले. हे करताना त्याचे स्वागत झाले असे नाही. सुरुवातीच्या काळात याला छुपा विरोध झाला. मात्र मला आनंद आहे की हे महिला धोरण संपूर्ण देशाने स्वीकारले. त्यामुळे अनेक क्षेत्रात अतिशय उत्तम कर्तृत्व मुली दाखवत आहेत. ज्यातून देशाला पुढे नेण्यासाठी योगदान मिळत आहे, असं शरद पवार म्हणाले.
“या सर्व निर्णयाबद्दल मला कोणी विचारते तेव्हा मला माझी आई आठवते. माझ्यावर जे संस्कार घडले, जे विचार आले, त्यामागे माझी आई आहे. तिच्या कष्टांमुळेच कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो हे चित्र घरात निर्माण झाले. त्यामुळे आम्ही सर्व भावंडं जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालो”, असं म्हणत शरद पवारांनी आईविषयी गौरवोद्गार काढले.
“एखादी भगिनी एक व्यक्तिमत्व कसे घडवते, एक कुटुंब कसे घडवते, याची शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळे अशी उदाहरणं देण्यासंबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व ज्या व्यक्तींकडे आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना अधिकार दिला पाहिजे. हे जसे आपण करत राहू तसा हा देश आणि समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. आज देशात जे बदल दिसत आहेत त्यात पुरूष आणि महिलांच्या अधिकारात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत काही अंतर नाही, असंही पवारांनी पुढे स्पष्ट केलं.
हेही वाचा >> “नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते का?” न्यू यॉर्क टाईम्समध्ये पंतप्रधानांचं कौतुक
“देशात स्वातंत्र्यानंतरच्या शक्तीशाली प्रधानमंत्री कोण हे विचारल्यावर इंदिरा गांधी हे उत्तर येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंदिरा गांधींनी देशात एक प्रतिष्ठा देण्याचे काम केले. रशियासारख्या बलाढ्य देशाने तेव्हा आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा जो सन्मान करायला हवा होता तो केला नाही म्हणून आपला स्वाभिमान गहाण टाकू शकत नाही, हे दाखवण्याची भूमिका तेव्हा इंदिरा गांधींनी घेतली. त्या एक शक्तीशाली प्रधानमंत्री होत्या म्हणून हे घडलं, असं पवार म्हणाले.