‘स्थानिक संस्था करा’ तील (एलबीटी) जाचक तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (२२ एप्रिल) पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत बंदमध्ये सहभाग घेणाऱ्या मार्केट यार्ड येथील आडते आणि दलालांचे परवाने निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘एलबीटी’ विरोधात व्यापाऱ्यांची राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद करू नये, असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आले असल्याचे बी. जे. देशमुख यांनी सांगितले. महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया याप्रसंगी उपस्थित होते. या बंदमध्ये सहभाग घेणाऱ्या आडते आणि दलालांवर बाजार समिती कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. प्रसंगी त्यांचे परवानेदेखील निलंबित करण्याचे पाऊल उचलावे लागेल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
बी. जे. देशमुख म्हणाले, व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी करण्याचे थांबविले असल्यामुळे बाजारामध्ये गर्दी झाली आहे. मालाची कृत्रिम टंचाई आणि दरवाढ होण्याची शक्यता वाढली आहे. यामध्ये ग्राहकांची पिळवणूक होऊ नये यासाठी सरकारशी चर्चा सुरू असताना व्यापाऱ्यांनी बंद करू नये, अशी भूमिका मांडली आहे. त्याचप्रमाणे परवानाधारक आडते आणि दलाल यांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. बाजारामध्ये ४०३ आडते असून १३४ दलाल आहेत. यापूर्वी सहा दिवसांचा बंद केला होता त्यावेळी व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवण्यासाठीची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पणन संचालकांच्या आदेशानुसार बाजार समितीस बाजार बंद ठेवण्याबाबतचा अधिकार नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य करता येत नसल्याचे व्यापाऱ्यांना कळविण्यात आले होते. मात्र, आता बंद करून ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला तर, बाजार समिती आडते आणि दलाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल.
या बैठकीमध्ये काही व्यापाऱ्यांनी ‘दुकाने उघडू पण, व्यवहार स्थगित ठेवू’, अशी भूमिका मांडली. पण, दुकाने उघडी ठेवून व्यवहार करणार नसतील तर, तो बंदच समजून कारवाई केली जाईल, असे व्यापाऱ्यांना सांगण्यात आले असल्याचे बी. जे. देशमुख यांनी स्पष्ट केले.

मालाची आवक घटली
राज्यव्यापी बेमुदत बंदचा पहिला टप्पा म्हणून व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (१५ एप्रिल) खरेदी बंद केली आहे. त्यामुळे बाजार समितीकडे होणाऱ्या मालाची आवक घटली आहे. सोमवारी २७ हजार क्विंटल झालेली आवक मंगळवारी १८ हजार क्विंटलपर्यंत घटली आहे. यापूर्वी बंदच्या काळात अतिशय कमी आवक झाली होती, अशी माहिती बी. जे. देशमुख यांनी दिली.